(देवरूख / वार्ताहर)
देवरूख-मार्लेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवरूख पोलिसांनी पावले उचलली आहेत. भरधाव डंपरमुळे अपघात होण्याचा धोका टाळून वाहनचालक आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक, डंपरचे मालक आणि चालक यांची सोमवारी सायंकाळी बोंड्ये येथे बैठक घेतली. या बैठकीत वाहतुकीचे नियम पाळण्यासह वाहनांच्या सुरक्षिततेबाबत विविध सक्त सूचना देण्यात आल्या.
देवरूख-मार्लेश्वर मार्गावरून स्थानिक नागरिकांसह मार्लेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सध्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्य डंपरमधून नेले जात आहे. या पार्श्वभूमीवर डंपरचा वेग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन हा सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी निवेखुर्द येथील अवघड वळणावर एका डंपरचा भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या परिस्थितीची दखल घेत पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी संबंधित कंपनीचे व्यवस्थापक, डंपरमालक आणि चालकांना एकत्र बोलावून वाहतुकीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. डंपरचालकांनी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा, रस्त्यावरील परिस्थिती लक्षात घेऊन सावधपणे वाहन चालवावे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीत चालकांनी वाहन चालवताना स्वतःजवळ वैध ड्रायव्हिंग लायसन्स ठेवणे, वाहनांची कागदपत्रे अद्ययावत व व्यवस्थित ठेवणे आणि मद्यपान करणाऱ्या चालकांची नियुक्ती टाळणे, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच सर्व डंपरना एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट बसवणे, वाहनांचे साइड इंडिकेटर आणि हेडलाईट सुरू स्थितीत ठेवणे, तसेच ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, तेथे वाहनचालकांना सावध करणारे फलक लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकाम साहित्याची वाहतूक आवश्यक असली, तरी त्यादरम्यान इतर वाहनचालक, दुचाकीस्वार, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये, यावर पोलिसांनी भर दिला आहे. डंपरच्या वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळले जावेत आणि अपघाताचा धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जावी, यासाठी देवरूख पोलिसांनी संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.


