(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणच्या आंब्याची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा प्रथमच आवक झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हापूस बाजारात दाखल झाल्याने फळविक्रेते आणि खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री शाहू मार्केट यार्डातील गाळा क्रमांक १५ येथे दस्तगीर बागवान यांच्या प्रसिद्ध पेढीवर हापूस आंब्याचे ४० बॉक्स दाखल झाले. या आगमनामुळे कोल्हापूरच्या फळ बाजारात चैतन्य निर्माण झाले असून, दिवाळीतच हापूसच्या आमरसाचा आस्वाद घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
या पहिल्या आवकेतील हापूस आंब्याला स्थानिक फळविक्रेते प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी १२ नग असलेली एक पेटी २,५०० रुपये दराने खरेदी केली. हापूस आंब्याची बाजारपेठेतील मागणी आणि ग्राहकांची उत्सुकता लक्षात घेता, हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा दर व्यापारी वर्गासाठी समाधानकारक ठरला आहे.
या आवकेचे वैशिष्ट्य म्हणजे हा हापूस आंबा थेट तामिळनाडू राज्यातून कोल्हापुरात दाखल झाला आहे. मात्र, त्यासाठी वापरण्यात आलेली आंब्याची मूळ रोपे कोकणातील आहेत. कोकणातून खास नेण्यात आलेल्या अस्सल हापूस आंब्याच्या रोपांची तामिळनाडूमध्ये लागवड करण्यात आली होती. तेथील अनुकूल हवामानाचा लाभ घेत स्थानिक शेतकऱ्यांनी हापूसचे यशस्वी उत्पादन घेतले. कोकणातील दर्जेदार रोपे आणि तामिळनाडूतील पोषक हवामान यांच्या समन्वयातून तयार झालेला हा आंबा आता कोल्हापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या आंब्याचे आगमन झाल्याने ग्राहकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह विविध स्तरांतील खवय्ये हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे बाजारात पहिली आवक होताच व्यापाऱ्यांनीही आंबा खरेदी करण्यास उत्सुकता दाखवली. आगामी काळात हापूस आंब्याची आवक आणखी वाढेल, असा विश्वास फळविक्रेते प्रसाद वळंजू यांनी व्यक्त केला आहे.


