( मुंबई )
आर्थिक फसवणूक आणि सेक्सटॉर्शनच्या गंभीर प्रकरणात एका महिला क्रिकेटरला अटक करण्यात आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरची रहिवासी असलेली 30 वर्षीय फारखांदा खान हिने दोन साथीदारांसह दक्षिण मुंबईतील एका तरुण व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत तब्बल 63 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ती नुकत्याच पार पडलेल्या टी-20 लीग स्पर्धेतही सहभागी झाली होती.
दोन वर्षे सुरू होता ब्लॅकमेलिंगचा खेळ
पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्याची मोडस ऑपेरंडी अत्यंत नियोजनबद्ध होती. दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे राहणारा व्यावसायिक एप्रिल 2024 मध्ये पश्चिम उपनगरात राहत असताना फरखंदाच्या संपर्कात आला. हळूहळू ही ओळख जवळच्या मैत्रीत बदलली आणि दोघांमध्ये वैयक्तिक चॅटिंग सुरू झाले. याच दरम्यान फारखांदाने आर्थिक अडचणीचे कारण सांगत सुरुवातीला 20 हजार रुपये घेतले. त्यानंतर ती वेळोवेळी पैशांची मागणी करत राहिली. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने खासगी चॅट्स आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केली. बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या पीडिताने तिला आधी 23 लाख आणि नंतर 40 लाख असे एकूण 63 लाख रुपये दिले.
अखेर पोलिसांत तक्रार, सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल
ब्लॅकमेलिंगचा त्रास वाढत गेल्यानंतर पीडिताने जानेवारी 2026 मध्ये मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आले. तपासात समोर आले की, उकळलेली रक्कम फारखांदाने स्वतःकडे न ठेवता तिच्या वडील, भाऊ आणि साथीदारांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती. तिचा भाऊ बाझिल अझिज खान देखील पीडिताला फोनवर धमक्या देत होता. फरखंदाचा भाऊ बाझिल हा सातत्याने या उद्योगपतीला धमकावत होता. “तुला जेलमध्ये पाठवेन,” अशी धमकी देऊन तो वारंवार पैशांसाठी दबाव टाकत होता.
मुंबई क्राईम ब्रांचने सापळा रचून फारखांदा खान आणि तिचा भाऊ बाझिल अझिज खान (27) यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक केली. तर तिसरा आरोपी उद्दीन इम्तियाझ वानी (22) याला जम्मू-काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले. या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आयटी अॅक्ट अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या टोळीने अशाच प्रकारे इतर कोणाला फसवले आहे का, जाळ्यात अडकवले आहे का याचा तपास सध्या सुरू असून क्राईम ब्रांच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

