(संगमेश्वर)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावणारी तन्वी कोलते उद्या, शुक्रवार (२४ एप्रिल २०२६) रोजी आपल्या साखरपा या मायभूमीत परतत आहे. तिच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी साखरपा परिसरात भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
ही स्वागत रॅली संध्याकाळी ५ वाजता रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून सुरू होणार असून, साखरप्याच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करणार आहे. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत तन्वीचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.
रॅलीची सांगता नानासाहेब शेट्ये सभागृहात होणार असून, त्याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी’मधील आपला प्रवास, अनुभव आणि यशाबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच ती आपल्या कुटुंबीय, गावकरी आणि चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहे.
या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. रॅली मार्गावर पोलीसांची चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
तन्वीच्या स्वागतासाठी साखरपा सज्ज झाला असून, तिच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

