( संगमेश्वर )
संगमेश्वर व्यापारी संघातर्फे संगमेश्वर पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन, कायदा व सुव्यवस्थेची उत्तम अंमलबजावणी, तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना केल्यामुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कामगिरीमुळे गणेशोत्सव काळात कोकणात आलेले गणपती भक्त आणि गावात आलेले पाहुणे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. संगमेश्वरच्या लोकांनी आणि व्यावसायिकांनी पोलीस दलाच्या तत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद भिंगार्डे, सचिव अनिल भिडे, खजिनदार अभय गद्रे, उपाध्यक्ष सुशांत कोळवणकर तसेच दिलीप रहाटे, राजेश नारकर, विवेक शेट्ये, नील खातू, जयकांत पटेल आणि पोलिस पाटील अंगरज कोळवणकर यांच्या उपस्थितीत हा आभारप्रदर्शन कार्यक्रम पार पडला.संगमेश्वर व्यापारी संघाच्या वतीने पुढील काळातही अशाच प्रकारचे सहकार्य व संवाद सुरु राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

