(रत्नागिरी)
समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शुभांगी कोलगे- बेलवलकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘श्रीमती यमुनाबाई खेर सर्वोदय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे हा पुरस्कार येत्या रविवारी दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता प्रदान केला जाणार आहे.
सर्वोदय छात्रालयातील मोरोपंत जोशी सभागृहात हा सोहळा आयोजित केला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गीते भूषविणार आहेत. यंदा या पुरस्काराचे १७ वे वर्ष आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, सोनवीताई देसाई, बाळकृष्ण शेलार, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके व उपाध्यक्ष जयश्री बर्वे यांनी केले आहे.
शुभांगी बेलवलकर यांचा अल्पपरिचय
श्रीमती शुभांगी कोलगे- बेलवलकर या कोसुंब- संगमेश्वर येथील रहिवासी असून, त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या शिक्षण, आरोग्य, महिला संघटन-सक्षमीकरण, नेतृत्वविकास, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत गेली ३५ वर्षे सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहेत. दुर्गम भागातील कातकरी, धनगर मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे खडतर कार्य करत आहेत. संगमेश्वर तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून महिला संघटन, गुहागरमध्ये मच्छीमार महिलांचे संघटन त्यांनी केले आहे. बचतगट साखळी, महिला व किशोरवयीन मुलींचे आरोग्यप्रश्न, उद्योजकता विकास प्रशिक्षण, महिला नेतृत्व विकसन, कौटुंबिक सल्ला व सहाय्यता केंद्र या माध्यमातून कार्य करत आहेत. पती श्रीराम बेलवलकर यांच्यासमवेत साहिल संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा यमुनाबाई सर्वोदय पुरस्कार दिला जाणार आहे.

