(मंडणगड / रत्नागिरी)
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस ठाण्याच्या इमारतीतच दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळी ६.२० ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान मंडणगड पोलीस ठाण्याच्या इमारतीतच हा प्रकार घडला. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी राज अभिषेक विन्हेरकर (वय २२, रा. शिरवली, पोष्ट पांगरी, ता. महाड, जि. रायगड) आणि अनिल अनंत घरटकर (रा. भिंगळोली, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या दोघांनी फिर्यादी यांच्या समक्ष आपापसांत वाद घातला. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि परस्पर मारहाणीत झाले. दोघांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस सूर्यकांत मोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


