(मुंबई)
लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला जाणर असून, ‘फेसलेस’ प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर Transport Commissionerate Maharashtra आता कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. नव्या प्रस्तावानुसार, लर्निंग लायसन्सची परीक्षा देण्यासाठी अर्जदारांना प्रत्यक्ष Regional Transport Office (आरटीओ) कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली सध्या वादात सापडली आहे. तांत्रिक त्रुटींचा गैरवापर करून काही जण उमेदवार न उपस्थित राहता ऑनलाइन परीक्षा देत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः National Informatics Centre (एनआयसी) च्या सुरक्षा यंत्रणेला बगल देत परीक्षा पास करण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
तपासात समोर आले आहे की, काही जण वेबसाइटच्या डेव्हलपर टूल्सचा वापर करून जावा कोडमध्ये फेरफार करतात. त्यामुळे उमेदवाराची माहिती पडताळणीशिवाय भरता येते आणि कोणाच्याही नावासमोर कोणाचाही फोटो अपलोड करता येतो. परिणामी, अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही परीक्षा देणे शक्य होते. या प्रकारांमुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाल्याने संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नव्या प्रस्तावात काय बदल?
नव्या आराखड्यानुसार अर्जदारांना पूर्वीप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरून स्लॉट बुक करता येईल. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी त्यांना आरटीओ कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल. यामुळे अर्जदार आणि परीक्षा देणारी व्यक्ती एकच आहे का, याची खात्री करणे सोपे होईल. प्रशासनाच्या मते, या बदलामुळे बनावट पद्धतीने लायसन्स मिळवण्याच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल.
या बदलामुळे नागरिकांना पुन्हा आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये गर्दी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे व्यवस्थापनासाठी प्रशासनाला अतिरिक्त उपाययोजना कराव्या लागतील. तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य केल्याने दलालगिरी पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाइन प्रक्रियेमुळे काही प्रमाणात पारदर्शकता आली होती, मात्र आता ती टिकवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, लर्निंग लायसन्स देण्याची जबाबदारी आरटीओवर असली तरी या गैरप्रकारांमध्ये त्यांचा थेट सहभाग नाही. मात्र, प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे. लर्निंग लायसन्स प्रक्रियेत होणारा हा संभाव्य बदल नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य मानला जात असला, तरी त्याची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या सोयीचा समतोल राखणे आवश्यक ठरणार आहे. अंतिम नियमावली काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

