(ठाणे)
कल्याणमधील भारतीय जनता पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दिनेश तावडे यांचे आज (शुक्रवारी दि. १६) सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे ते भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
दिनेश तावडे यांनी १९७४ पासून भाजपाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांच्या कुशल नेतृत्वगुणांमुळे आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्यांनी स्वीकृत नगरसेवक, नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची पदे भूषवली होती. आणीबाणीच्या काळातही त्यांनी पक्षासाठी अत्यंत समर्पितपणे काम केले, अशी आठवण त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या निधनामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारा एक निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.