(रायगड / अलिबाग)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर संबंधित महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जीव रक्षकांनी तत्काळ अलिबाग पोलिसांना यांना कळवले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पर्समध्ये चिठ्ठी; आत्महत्येचा संशय
महिलेच्या जवळ एक पर्स आढळून आली असून, तिचा पट्टा महिलेच्या हाताच्या अंगठ्यात अडकलेला होता. पर्सची तपासणी केली असता कोणताही ओळख पटविणारा पुरावा सापडला नाही. मात्र, त्यामध्ये एक चिठ्ठी, काही औषधे, केसांची क्लिप आणि काही रोख रक्कम सापडली. सदर चिठ्ठीत “आईला कलंक आहे, मी कार्लेखिंड येथे आत्महत्या करीत आहे” असा मजकूर लिहिलेला असून त्यावर ‘पी. जी. पाटील’ अशी सही असल्याचे समोर आले आहे. या मजकुराच्या आधारे आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत महिलेचे वय अंदाजे 40 वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट, बांधा सडपातळ आणि वर्ण निमगोरा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस स्थानक येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेची ओळख पटविणे आणि मृत्यूमागील नेमके कारण शोधणे यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

