(छत्रपती संभाजीनगर)
विधानसभा निवडणुकीत ‘माझी लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी आणखी एक महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने त्यांनी राज्यातील एक कोटी महिलांना “लखपती दिदी” बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत महिलांना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांनी लघुउद्योग व व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे यासाठी शासन आर्थिक पाठबळ देणार आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून राज्यात मागील वर्षी 25 लाख भगिनी लखपती बनल्या असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षीही तितक्याच महिला लखपती बनणार असून एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ची राज्यव्यापी सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आला. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून राहावे लागू नये. बचत गटांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिले जाईल. प्रत्येक गावात पतसंस्था सुरू करून महिलांना १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. अशा प्रकारे एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले आहे. “२५ कोटी लोक गरिबीच्या रेषेखालून बाहेर आले आहेत, १५ कोटींना स्वतःचे घर मिळाले आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे शक्य झाले,” असे फडणवीस म्हणाले.

