(मुंबई)
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत आणि मंत्रालयापर्यंत पोहोचत असल्याचा गंभीर दावा करत त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली.
अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांमध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप आहे. कॉल डिटेल्सच्या आधारे अनेक अधिकाऱ्यांनी खरात याच्याशी शेकडो वेळा दूरध्वनीवर संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला.
यामध्ये विशेषतः अभिजीत भांडे-पाटील यांचे नाव घेत दमानिया यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भांडे-पाटील यांनी दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अशोक खरात याच्याशी अनेक वेळा संपर्क साधला. एका फोनवरून 143 वेळा आणि दुसऱ्या फोनवरून 53 वेळा कॉल केल्याचा दावा त्यांनी केला. ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात (SRA) कार्यरत होते आणि सध्या त्यांची बदली झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दमानिया यांनी पुढे सांगितले की, अशोक खरात याला वाचवण्यासाठी काही अधिकारी सक्रियपणे प्रयत्न करत होते. या संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावरही दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, चाकणकर यांनी अशोक खरात याला 177 वेळा फोन केला होता. एका कॉलवर तब्बल 22 मिनिटे संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला. तसेच महिला आयोगाकडून पाठवलेल्या नोटीसनंतर या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात आल्याबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला. “इतकी घाई का झाली?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करत चाकणकर यांना SIT चौकशीसाठी तातडीने बोलावण्याची मागणी केली.
दरम्यान, अशोक खरात याचे कुटुंबीय सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची पत्नी कल्पना खरात, मुलगी तृप्ती खरात तसेच इतर कुटुंबीयांचा शोध सुरू असून त्यांना कोणीतरी संरक्षण देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या विविध पातळ्यांवर सुरू आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय, SIT तसेच अहमदनगर पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
या सर्व घडामोडींमुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अधिकच गाजण्याची शक्यता असून, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता SIT चौकशीतून नेमके कोणते पुरावे समोर येतात आणि आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

