( मुंबई )
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी 2 लाख 56 हजार 137 कोटी रुपयांच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमधून राज्यात 1 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुंतवणूक आणि रोजगाराला मोठी चालना
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या उद्योग प्रकल्पांद्वारे रोजगारनिर्मितीला गती मिळणार आहे. नाशिकमध्ये व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. 800 कोटींची गुंतवणूक करून 500 रोजगार निर्माण करणार आहे. अमरावतीत टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि. 1 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. 1 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून 1 हजार रोजगार देणार आहे.
पुण्यातील शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. 1500 कोटींच्या प्रकल्पातून 3 हजार रोजगार निर्माण होणार आहेत, तर गडचिरोलीमध्ये हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. 3,135 कोटींच्या गुंतवणुकीतून 8 हजार रोजगार उपलब्ध करून देणार आहे. अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस 4 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून 1 हजार रोजगार निर्माण करणार आहे.
तळेगाव, नागपूर, रायगडमध्ये मोठे प्रकल्प
पुण्यातील तळेगाव येथे युरोबस इंडिया प्रा. लि. 4200 कोटींची गुंतवणूक करून 12 हजार रोजगार निर्माण करणार आहे. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि. 11,400 कोटींची गुंतवणूक करून 7 हजार रोजगार निर्माण करेल. भंडाऱ्यात अशोक लेलँड लि. 10 हजार कोटींची गुंतवणूक करून 1 हजार रोजगार देणार आहे. रायगड आणि पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेकचा ग्रीन स्टील प्रकल्प 11 हजार कोटींची गुंतवणूक आणि 2500 रोजगार देणार आहे. नागपूरमध्ये सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. 12,780 कोटींच्या गुंतवणुकीतून 6825 रोजगार निर्माण करणार आहे.
सर्वात मोठी गुंतवणूक रायगडमध्ये
रायगडमध्ये एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून 56,852 कोटी रुपयांची सर्वात मोठी गुंतवणूक होणार असून, त्यातून तब्बल 25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. 40 हजार कोटींची गुंतवणूक करून 20 हजार रोजगार देणार आहे. तसेच अॅकमे क्लीनटेकचा ग्रीन अमोनिया प्रकल्प 37,800 कोटींची गुंतवणूक आणि 4500 रोजगार निर्माण करणार आहे.
उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांना प्रोत्साहन
या सर्व प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा, ग्रीन स्टील, ग्रीन अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयर्न बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्टील आणि गॅस टू केमिकल्स यांसारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांना विशेष प्रोत्साहन देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
राज्याच्या औद्योगिक विकासाला गती
या गुंतवणुकीमुळे कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागांसह संपूर्ण राज्यात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच संशोधन-विकास, नवकल्पना आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही याचा मोठा फायदा होईल. तसेच, स्थानिक युवकांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

