(मुंबई/ पंढरपूर)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष एसटी बस चालविण्याचे नियोजन केले आहे. तसेच ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांच्या समूहाने नोंदणी केल्यास राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
चंद्रभागा बसस्थानक येथे आषाढी यात्रा नियोजनाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सरनाईक यांनी सांगितले की, विशेष बस सेवेमध्ये शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहतील. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाईल. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात संपर्क साधून विशेष बससाठी आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यात्रेदरम्यान बसस्थानकांवरील बसेसची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, “आषाढी यात्रेसाठी विशेष बस सेवा” असे दर्शनी फलक, तसेच चालक-वाहकांच्या वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासात होणारी गर्दी लक्षात घेऊन मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
मागील वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटीने ५,१४५ विशेष बस चालवून सुमारे २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्यापेक्षा अधिक व्यापक नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. यात्रेसाठी पंढरपूर परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वारी कालावधीत रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या एसटीच्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केली आहे.
भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी
आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी असून, यात्रेदरम्यान १८ ते २० लाख वारकरी भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी सुलभ स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

