(पुणे)
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला 24 वर्षीय गौतम गायकवाड अखेर सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी (24 ऑगस्ट) सायंकाळी काही स्थानिक नागरिकांनी दरीच्या एका भागात हालचाल दिसल्याने शोध घेतला आणि गौतम आढळून आला. रविवारी तानाजी मालुसरे यांच्या समाधी मागील परिसरामध्ये गौतम सापडला. पोलिस पथकाला याबाबत कळवण्यात आले असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल केले केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या 5 दिवसातील घटनाक्रम चोकशी अंती कळू शकणार आहे.
हवेली पोलिसांच्या माहितीनुसार, हैदराबादचा रहिवासी गौतम गायकवाड आपल्या पाच मित्रांसोबत 20 ऑगस्ट रोजी पुण्यात आला होता. संध्याकाळी सर्वजण सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा परिसरात फिरत होते. त्यावेळी गौतमने “लघुशंका करून येतो” असे सांगून दूर गेला, मात्र परत न आल्याने मित्रांनी शोधाशोध सुरू केली. थोड्याच वेळात हवा पॉइंटजवळ त्याची चप्पल सापडली. त्यामुळे तो दरीत कोसळल्याचा संशय बळावला.
तत्काळ पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. हेल्मेट, दोरखंड, टॉर्च, थर्मल कॅमेरे यांचा वापर करून सलग पाच दिवस शोधमोहीम राबवली गेली. तरीदेखील कोणताही ठसा लागत नव्हता. मात्र रविवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर त्याचा थांगपत्ता लागला. गौतम पाच दिवस खोल दरीत अडकूनही जिवंत असल्याची बाब आश्चर्यकारक आणि दिलासादायक ठरली आहे.
सिंहगड किल्ल्यावरील सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सिंहगड किल्ला हा पुण्यातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. तानाजी कडा परिसरात रेलिंग वा सुरक्षात्मक सुविधा नसल्याने पाय घसरून दरीत कोसळण्याचे प्रकार वारंवार घडतात.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने वारंवार दिलेल्या सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो काढणे अथवा कड्याच्या टोकापर्यंत जाण्याची प्रवृत्ती कायम असल्याने शोधमोहीमेदरम्यान बचाव पथकाला मोठा धोका पत्करावा लागतो. या घटनेनंतर सिंहगड किल्ल्यावर रेलिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच सुरक्षित पायवाटा उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पोलिस तपास सुरू असून घटनेचा सविस्तर अहवाल लवकरच जाहीर होणार आहे.
दरम्यान, बेपत्ता झालेल्या गौतमने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचाही संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. २४ वर्षीय गौतम गायकवाड हा मूळचा साताऱ्याचा रहिवासी असून पाच दिवसांपूर्वी तो मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला होता. तानाजी कड्याजवळ तो पाय घसरून दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस, हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने सलग पाच दिवस मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, मात्र त्याचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता. आता या शोधमोहीमेचा शेवट झाला आहे.

