( नाशिक )
भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या वेळी कल्पना खरात यांनी पतीच्या गुन्ह्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत न्यायालयात आपली बाजू मांडली.
राहता न्यायालयात झालेल्या सुनावणीत कल्पना खरात यांनी सांगितले की, “माझ्या पतीने केलेले गुन्हे गंभीर आहेत, मात्र त्यामध्ये माझा कोणताही सहभाग नाही.” तसेच, “मी पतीच्या कोणत्याही व्यवहाराला प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. बँकेतील खाते माझ्या नावावर असले तरी ते पतीच चालवत होते,” असा युक्तिवादही करण्यात आला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, “माझे पती सध्या तुरुंगात आहेत. मी न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे रोज हजेरी लावण्यास तयार आहे. आमच्या सर्व मालमत्ता जप्त झाल्या असून, मी नियमित आयकर भरत आहे. ‘शिवसंकल्प हार्डवेअर’ हा माझा व्यवसाय आहे.”
सरकारी पक्षाचा जोरदार विरोध
दरम्यान, सरकारी वकिलांनी बचाव पक्षाचे सर्व दावे फेटाळून लावले. त्यांनी न्यायालयात स्पष्ट सांगितले की, कल्पना खरात यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे. जमीन खरेदीच्या कागदपत्रांवर त्यांची सही आणि अंगठा असल्याचे पुरावे सादर करण्यात आले. तसेच, त्यांच्या बँक खात्यातून फिर्यादीला मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचेही निदर्शनास आणून दिले. सरकारी पक्षाने आणखी एक मुद्दा मांडताना सांगितले की, पावर ऑफ अटर्नीमध्ये फक्त खरेदीचा अधिकार देण्यात आला होता. मात्र दस्त आणि पावर ऑफ अटर्नी एकाच दिवशी तयार करूनही खरेदीखत दोन दिवसांनी का करण्यात आले, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके यांच्यासह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
फिर्यादीच्या वकिलांनी दावा केली की, या संपूर्ण व्यवहारात अनेक आर्थिक देवाणघेवाणी झाल्या असून हा प्रकार मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असू शकतो. त्यांनी सांगितले की संबंधित एमओयूमध्ये कल्पना खरात यांना दोन टक्के व्याज देण्याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्यांना या व्यवहारातून आर्थिक फायदा होणार होता.
या प्रकरणाचे तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले की, कल्पना खरात यांच्या खात्यातून तब्बल 7 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्या कोणत्याही नोकरीत नसताना इतका मोठा आर्थिक व्यवहार कसा झाला, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी पक्षाने पुढे युक्तिवाद करत सांगितले की, अशोक खरात यांच्या सुमारे 40 टक्के मालमत्तेमध्ये कल्पना खरात भागीदार आहेत. त्यामुळे या सर्व व्यवहारांची त्यांना पूर्ण माहिती होती, असा दावा करण्यात आला.
कल्पना खरातच्या वतीने कोर्टात युक्तिवाद करताना मुलांचा उल्लेख करण्यात आला. ‘माझ्या पतीने गंभीर गुन्हे केले आहेत. सध्या मीडिया ट्रायल सुरू असून कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्याचा डाव आहे. माझा मुलगा18 वर्षांचा आहे. मला एक मुलगी आहे. माझे पती तुरुंगात आहे. ते बाहेर येतील की नाही मला माहीत नाही. आता कुटुंबाची काळजी मलाच घ्यायची आहे. त्यामुळे मला अटकपूर्व जामीन द्यावा. मी रोज हजेरीसाठी येण्यास तयार असून मी कुठेही पळून जाणार नाही’, असं कल्पनाच्यावतीने वकिलांनी कोर्टात सांगितले.
एकीकडे कल्पना खरात यांनी गुन्ह्यांशी संबंध नसल्याचा दावा केला असला, तरी दुसरीकडे सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

