(राजापूर / तुषार पाचलकर)
सकल हिंदू समाज, पाचल पंचक्रोशीच्या वतीने येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. तळवडे येथील प्रभावती हॉल येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत हा संमेलन कार्यक्रम पार पडणार आहे.
सध्याच्या सामाजिक परिस्थितीत हिंदू समाजासमोर विविध आव्हाने उभी राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाज एकत्र येऊन विचारमंथन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. हिंदू संस्कृतीचे जतन, कुटुंबव्यवस्थेचे रक्षण तसेच समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजातील एकात्मता दृढ करणे, सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे, तसेच भविष्यातील पिढ्यांपर्यंत परंपरा आणि संस्कार पोहोचवणे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः कुटुंबव्यवस्थेवर होणारे परिणाम, धार्मिक व सांस्कृतिक ओळख टिकवण्याची गरज आणि समाजातील एकजुटीचे महत्त्व यावर या व्यासपीठावरून मार्गदर्शन होणार आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण पंचक्रोशीतील हिंदू समाज एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणार असून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर चर्चा घडवून आणत भविष्यासाठी सकारात्मक दिशा ठरवण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनात ह.भ.प. श्री. लक्ष्मण शेरे (तळवडे) हे संयोजक म्हणून कार्यरत असून, ह.भ.प. श्री. संतोष चव्हाण (ताम्हाणे) हे सहसंयोजक आहेत. तसेच श्री. कुंजन साळवी (तळवडे) हे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमासाठी तळवडे, ताम्हाणे, पाचल, करक, आंबा, पांगरी, येरडव, कारवली, पाटकरवाडी आदी गावांतील सकल हिंदू समाज समितीचे सदस्य सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच विविध गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.
संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जपणूक यांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

