( मुंबई )
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १ जून २०२६ पासून राज्यभर विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी प्रत्येक एसटी तिकिटामागे २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारण्यात येत असून, दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ५० लाख प्रवाशांकडून जवळपास १ कोटी रुपयांचा निधी जमा होत आहे. मात्र, या निधीच्या तुलनेत राज्यातील अनेक बसस्थानके, आगार आणि स्वच्छतागृहांची स्थिती अजूनही अत्यंत दयनीय असल्याचे चित्र समोर येत आहे.
राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुमारे १४ हजार बस दररोज रस्त्यावर धावतात. या बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी बसस्थानके, आगार परिसर, प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे आणि एसटी बसांची नियमित स्वच्छता व्हावी, यासाठी विशेष अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील ५६० हून अधिक बस आगार आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संसद भवनासारख्या उच्च दर्जाच्या वास्तूंची स्वच्छता करणाऱ्या कंपनीच्या उपकंपनीकडे हे काम सोपविण्यात आल्याचे सांगितले होते. त्यामुळे एसटी बसस्थानकांच्या स्वच्छतेत मोठा बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, स्वच्छता मोहीम सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही अनेक बसस्थानकांमध्ये घाणीचे साम्राज्य कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर साचलेले पाणी, चिखल, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे, कचराकुंड्यांची अपुरी व्यवस्था आणि अस्वच्छ परिसरामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळ्यात अनेक आगारांमध्ये पाणी साचणे, गळती, चिखल आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ज्यासाठी दररोज कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला जातो, त्या निधीचा प्रत्यक्ष परिणाम प्रवाशांना जाणवत नसल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
एसटीच्या स्वच्छता मोहिमेचा उद्देश प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हा असला, तरी प्रत्यक्षात अनेक बसस्थानकांतील परिस्थिती या उद्दिष्टाशी विसंगत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जमा होणाऱ्या स्वच्छता अधिभाराचा वापर नेमका कसा होत आहे, तसेच खासगी कंपनीच्या कामकाजावर प्रभावी देखरेख केली जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांकडून दररोज जवळपास १ कोटी रुपयांचा स्वच्छता निधी जमा होत असताना, राज्यभरातील बसस्थानकांमध्ये स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या अडचणी लक्षात घेता, एसटी महामंडळाने स्वच्छता मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून प्रवाशांना प्रत्यक्ष दिलासा देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

