(दापोली / वार्ताहर)
महाड-दापोली राज्य मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, कुर्ला दिवेकरवाडी येथील अवघड वळणावर मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले. यामध्ये एसटीतील चार प्रवासी तसेच ट्रक चालकाचा समावेश आहे.
महाडकडे येणारी राधाकृष्णवाडी (मुमुर्शी) – महाड ही एसटी बस (क्र. MH-20 BL-3795) कुर्ला दिवेकरवाडी येथून प्रवासी घेऊन महाडच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी महाडहून दापोलीकडे जाणारा आयशर ट्रक (क्र. MH-06 W-6215) अवघड उतारावरील वळणावर समोरून येत एसटीला धडकला. धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
अपघातात एसटीतील चार प्रवासी जखमी झाले असून चालक व वाहकालाही किरकोळ दुखापत झाली. सर्वांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी महाड येथील डॉ. रानडे यांच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमी प्रवाशांची नावे :
- भूमिका बाबुराव कासारे (वय २१, रा. कुर्ले, ता. महाड) – डाव्या गुडघ्याला दुखापत
- काशीराम विठोबा कुळे (वय ७७, रा. करंजाडी) – डाव्या पायाला दुखापत
- पुष्पा प्रमोद यादव (वय ४०, रा. कुर्ले, ता. महाड) – उजव्या हाताला दुखापत
- प्रगती सुदेश कासारे (वय ३०, रा. कुर्ले, ता. महाड) – छातीला मार
जखमी प्रवाशांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून, एसटी महामंडळाकडून संबंधित प्रवाशांना आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

