(दापोली / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – ‘कृषी आणि संबंधित क्षेत्रातील श्रमविज्ञान व सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या वर्षासाठी देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्राच्या संशोधन, तंत्रज्ञान विकास, शेतकरी हिताची आधुनिक उपकरणे निर्मिती, प्रशिक्षण आणि विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण आगामी वार्षिक कार्यशाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, या यशामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संशोधन केंद्राचे प्रकल्प अन्वेषक प्रा. डॉ. विजय आवारे यांनी वार्षिक कार्यशाळेत केंद्राच्या संशोधन कार्याचा, विकसित तंत्रज्ञानाचा तसेच शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा प्रभावी आढावा सादर केला. त्यांच्या सादरीकरणाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून विशेष दाद मिळाली. प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुखबीर सिंग यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे अभिनंदन करत संशोधन केंद्राच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.
कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संशोधन केंद्रातील सर्व वैज्ञानिक, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करत हा पुरस्कार संपूर्ण विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. भविष्यातही शेतकरी-केंद्रीत संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान विकास आणि कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सन २००९ पासून कार्यरत असलेले हे संशोधन केंद्र कृषी व संबंधित क्षेत्रातील श्रमविज्ञान, सुरक्षितता आणि महिला तसेच शेतमजुरांचे श्रम कमी करणारी आधुनिक साधने विकसित करण्याचे कार्य करत आहे. शेतीतील कामगारांची कार्यक्षमता वाढविणे, शारीरिक ताण कमी करणे, अपघातांचे प्रमाण घटविणे आणि सुरक्षित कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही केंद्राची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
केंद्राने विकसित केलेल्या मनुष्यचलीत व बॅटरीचलीत ‘कोकण प्रसन्ना’, भात लावणी यंत्र, नाचणी मळणी-सडणी यंत्र यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण उपकरणांचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. या तंत्रज्ञानांपैकी अनेकांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून डिझाईन नोंदणी (Design Registration) प्राप्त झाली असून, ही यंत्रे विक्री तसेच भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा व्यापक प्रसारही करण्यात येत आहे.
संशोधनाबरोबरच शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि कृषी उद्योजकांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान गावागावात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्राने केले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांना या संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.
या राष्ट्रीय यशामागे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालनालय, विस्तार शिक्षण संचालनालय, शिक्षण संचालनालय, सहयोगी अधिष्ठाता, संबंधित विभागप्रमुख तसेच विद्यापीठ प्रशासनाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे प्रा. डॉ. विजय आवारे यांनी सांगितले. संशोधन केंद्रातील सर्व वैज्ञानिक, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

