(रत्नागिरी)
शासनाच्या विविध आरोग्य योजनांतून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना एकूण सुमारे ३ कोटी ७ लाख ६४ हजार रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरणाचा वेग वाढला आहे. तसेच सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालये, संस्था व दाते यांचे सहकार्यही मिळत आहे.
२० गंभीर आजारांसाठी मदत
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, गुडघा व हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायालिसिस, केमोथेरपी/रेडिएशन, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
सामंजस्य करारामुळे उपचार सुलभ
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार असून, गरजू बालकांना दर्जेदार उपचार सुलभ होणार आहेत.
राज्यभरातही मोठी मदत
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४०,७७६ रुग्णांना तब्बल ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याच कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यालाही मोठा लाभ झाला आहे.
सुधारित कार्यपद्धती, पारदर्शकता आणि तातडीने निर्णय घेण्यामुळे अधिकाधिक रुग्णांना वेळेत मदत मिळत आहे. अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

