(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यात गत शुक्रवार, २७ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका अनेक भागांना बसला असून पूर्व भागातील काजिर्डा गावाला त्याचा सर्वाधिक तडाखा बसल्याचे समोर आले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणातील आर्थिक फटका बसला आहे.
वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर काही घरांची सिमेंट पत्रे व कौले उडून गेल्याने घरांचेही नुकसान झाले आहे. तसेच झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे.
या आपत्तीत शिवाजी आर्डे, अनिता बारगोडे, चंद्रकांत शिंदे, भाऊ आर्डे, सुरेश आर्डे, दौलत आर्डे, अनिल गांगण, प्रदीप चेंदुरकर, अशोक गांगण, पांडुरंग गुरव, प्रभाकर कांबळे, मानाजी कांबळे, रमेश आर्डे, विजय कदम आदी शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ माहिती दिली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप घरांची पडझड व आंबा-काजू बागांचे पंचनामे करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

