(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर पोलीस स्टेशन नापत्ता रजिस्टर क्रमांक १६/२०२५ मधील शबनम युसूफ पाटणकर (वय २८, रा. सौंदळ, मुसलमानवाडी, ता. राजापूर) ही तरुणी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची नोंद तिच्या वडिलांनी केली होती. त्यांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात नापत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
नापत्ता तरुणी शबनम हिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. तीने दुसऱ्या दिवशी सकाळी एका महिलेच्या मोबाईलवरून घरी फोन करून सांगितले की ती गोव्यात आहे आणि तिला घरी यायचे आहे. काही वेळानंतर तिने पुन्हा दुसऱ्याच फोनवरून संपर्क साधत सांगितले की ती पनवेलला निघाली असून सध्या रेल्वेत बसली आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून लोकेशन तपासले. त्यानंतर राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर मांडवी एक्सप्रेस आगमनाच्या वेळी सहा पोलीस कर्मचारी, चार होमगार्ड आणि नातेवाईकांनी सर्व बोग्यांची तपासणी केली. यावेळी शबनम ही रेल्वेत बसलेली आढळून आली. तिला सुरक्षितपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. हा तपास अवघ्या २४ तासांत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
शोध मोहिमेत PSI मोबीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल घोगले, उकार्डे, शेलार, भेडसे, LHC वरक, होमगार्ड तेली, ताम्हनकर, सकपाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कदम आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम पार पाडली.

