(मुंबई / गणेश तळेकर)
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या बहुप्रतिक्षित राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटाचा भव्य ट्रेलर सोमवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ट्रेलर अधिकृतरीत्या सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रितेश देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेल्या या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनप्रवासाचे भव्य चित्रण करण्यात आले आहे. बाळ शिवाजीपासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडतो. विशेष म्हणजे, इतिहासातील काही दुर्लक्षित पण महत्त्वपूर्ण पैलू नव्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या ट्रेलर लाँच सोहळ्याला ज्योती देशपांडे, संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलिया देशमुख तसेच संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या वेळी बोलताना रितेश देशमुख म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व शब्दांत मांडणे अत्यंत कठीण आहे. गेली दहा वर्षे ‘राजा शिवाजी’ साकार करण्याचे स्वप्न मी पाहत होतो. अखेर २०२३ मध्ये या प्रवासाची सुरुवात झाली आणि आज तो टप्पा गाठला. हा चित्रपट आम्ही महाराजांच्या चरणी अर्पण करत आहोत.”
जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी सांगितले की, “हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक अनुभव नाही, तर भारताच्या अस्मिता, इतिहास आणि स्वाभिमानाचा भव्य आविष्कार आहे. प्रभावी कथा आणि भव्य मांडणीद्वारे आम्ही ही प्रेरणादायी गाथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
निर्माती जिनिलिया देशमुख यांनीही भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा प्रोजेक्ट आमच्यासाठी केवळ चित्रपट नाही, तर एक जबाबदारी आहे. संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले.”
चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, फरदीन खान, अमोल गुप्ते यांसह अनेक दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
भव्य दृश्यरचना, दमदार ॲक्शन आणि उच्च दर्जाची तांत्रिक मांडणी यामुळे ‘राजा शिवाजी’ आधीपासूनच चर्चेत आहे. ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली असून, हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

