(पालघर /नालासोपारा)
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘छावा’ चित्रपटात भूमिका साकारणारी आणि कुमकुम भाग्य सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगले हिने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरातील साई संतोषी इमारतीत राहणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने शनिवारी (१४ जून) सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये आत्महत्या केली. यावेळी तिने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता.
कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं, डॉक्टरांनी मृत घोषित केलं
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच आचोळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संचिताने आत्महत्येच्या अवघ्या २१ तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली शेवटची पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संचिता अत्यंत आनंदी चेहऱ्याने लिप्सिंग करताना दिसत आहे. यामध्ये ती आलिया भट्टच्या ‘राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओत संचिता खूप खूश दिसतेय, हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही वेळाने तिने आत्महत्या केली. इतकी आनंदी दिसणारी मुलगी अचानक असं टोकाचं पाऊल कसं उचलू शकते, असा सवाल करत चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्स करत दुःख व्यक्त केले आहे.

अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अवघ्या २२ व्या वर्षी संचिताने टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न चाहत्यांसह सर्वांनाच पडला असताना तिच्या जवळच्या मित्राने आणि मैत्रिणीने काही महत्त्वाचे दावे केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, संचिताचा जवळचा मित्र आणि अभिनेता उज्जवल शर्मा याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपासून संचिता आणि उज्जवल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, टेली चक्करला दिलेल्या मुलाखतीत उज्जवलने या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.
“आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो”
उज्जवल शर्मा म्हणाला, “आमच्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. पण आम्ही कधीही रिलेशनशिपमध्ये नव्हतो.” त्याने पुढे सांगितलं की, संचिता दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होती. “माझं तिच्यासोबत बराच काळ बोलणं झालं नव्हतं कारण मी माझ्या मूळ गावी होतो. मात्र, ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे खूप कठीण मानसिक परिस्थितीतून जात होती,” असा दावा त्याने केला.
“ती मदत मागत होती”
उज्जवलच्या म्हणण्यानुसार, संचिताची मानसिक अवस्था बिघडत असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं होतं. “अनेकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. ती स्वतःही सगळ्यांकडून मदत मागत होती. तिच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. जे काही झालं ते अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे,” असं म्हणत त्याने दुःख व्यक्त केलं.
जवळच्या मैत्रिणीचाही मोठा खुलासा
दरम्यान, संचिताची जवळची मैत्रीण मेघा शर्मा हिनेही काही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. ‘मनीकंट्रोल’शी बोलताना मेघाने सांगितलं की, “संचिता काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. ती वारंवार आत्महत्येविषयी बोलत होती.” मेघाने पुढे सांगितलं की, संचिताला काही आरोग्यविषयक समस्या होत्या आणि तिच्यावर उपचार सुरू होते. “जानेवारी महिन्यापासून ती वैयक्तिक कारणांमुळे मानसिक तणाव आणि डिप्रेशनमध्ये होती,” असा दावाही तिने केला.
पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास
आचोळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.” दरम्यान, अभिनेत्रीचे वडील मच्छिंद्र उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी रविवारी (१५ जून) आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील खरे कारण स्पष्ट होईल.
अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये केलं काम
संचिता उगले हिने अल्पावधीतच अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. तसेच विक्की कौशल अभिनीत ‘छावा’ चित्रपटातही ती झळकली होती. या चित्रपटात तिने ‘ताराबाई’ ही भूमिका साकारली होती. तिच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

