(मुंबई)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार वातावरण पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता ‘देऊळबंद 2’ चित्रपटही कमाईचे नवे विक्रम करताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहांमध्ये गर्दी कायम आहे.
पहिल्याच आठवड्यात ‘देऊळबंद 2’ सुपरहिट
मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देऊळबंद 2’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कमाई केली आहे. सैकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी 3.35 कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई 25.85 कोटी रुपयांवर पोहोचली असून ग्रॉस कलेक्शन 30.50 कोटी रुपये झाले आहे. आगामी सुट्यांमध्ये आणि वीकेंडमध्ये चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
10 कोटींच्या बजेटवर मोठा नफा
‘देऊळबंद 2’ चित्रपटाचे बजेट सुमारे 10 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने बजेटपेक्षा अधिक कमाई करत मोठा नफा मिळवला आहे. त्यामुळे हा चित्रपट 2026 मधील सुपरहिट मराठी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.
‘धर्मवीर’ला टाकलं मागे
‘देऊळबंद 2’ने कमाईच्या बाबतीत प्रवीण तरडेंच्याच ‘धर्मवीर’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. ‘धर्मवीर’ने बॉक्स ऑफिसवर 24.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘देऊळबंद 2’ने सातव्या दिवशीच 25.85 कोटींचा टप्पा पार केला. यासह ‘देऊळबंद 2’ हा प्रवीण तरडेंच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
‘देऊळबंद 2’ हा 2026 मध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. या यादीत रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ पहिल्या क्रमांकावर असून त्या चित्रपटाने तब्बल 57.7 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘देऊळबंद 2’ची दिवसनिहाय कमाई
- पहिला दिवस – 2.45 कोटी
- दुसरा दिवस – 2.55 कोटी
- तिसरा दिवस – 4.85 कोटी
- चौथा दिवस – 5.90 कोटी
- पाचवा दिवस – 3.40 कोटी
- सहावा दिवस – 3.35 कोटी
- सातवा दिवस – 3.35 कोटी
प्रवीण तरडेंचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
- ‘देऊळबंद 2’ – 25.85 कोटी
- ‘धर्मवीर’ – 24.67 कोटी
- ‘सरसेनापती हंबीरराव’ – 15.09 कोटी
- ‘धर्मवीर 2’ – 14.07 कोटी
- ‘मुळशी पॅटर्न’ – 9.4 कोटी
मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाई पाहता आगामी काळात आणखी मोठे विक्रम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

