(मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाला अखेर प्रदर्शनाची परवानगी मिळाली आहे. प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी दाखल करण्यात आलेली चित्रपट थांबवण्याची मागणी असलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, “मना’चे श्लोक” या चित्रपटाच्या शीर्षकाचा श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांशी साधर्म्य असला तरी त्यांच्याशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार देण्यात आला.
चित्रपट टीमकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
निर्णयानंतर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी लिहिले, “माननीय न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रदर्शन थांबवण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत घेत आहोत. मात्र, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी विरोध निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जे अत्यंत खेदजनक आहे.”
“हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका”
टीमने पुढे म्हटलं, “प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासूनच सोशल मीडियावर विरोधाचे मेसेज फिरू लागले. त्यामुळे संपूर्ण टीमला मानसिक त्रास सहन करावा लागला. चित्रपटात रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या श्लोकांचा कोणताही उल्लेख नाही. ‘मना’चे श्लोक’ हे शीर्षक नायक-नायिका मनवा आणि श्लोक यांच्या प्रवासाशी संबंधित आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, “आमचा कोणत्याही धार्मिक भावनांचा अवमान करण्याचा हेतू नाही. आम्ही श्री समर्थ रामदास स्वामींच्या रचनांचा सन्मान करतो.”
“मराठी सिनेसृष्टी उभारी घेत असताना विरोध करणे दुर्दैवी”
पोस्टच्या शेवटी टीमने म्हटलं — “आज मराठी सिनेसृष्टी स्वतःच्या पायांवर उभी राहण्यासाठी झगडत असताना, अशा कौटुंबिक सिनेमाचं स्वागत करण्याऐवजी माहिती न घेता विरोध करण्याचं वातावरण निर्माण झालं, हे निराशाजनक आहे. अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की, मनामध्ये कोणताही किंतु परंतु न ठेवता या चित्रपटाला प्रेम आणि आशीर्वाद द्यावा.”
मृण्मयी देशपांडेची तिहेरी भूमिका
या चित्रपटात मृण्मयी देशपांडे फक्त अभिनेत्रीच नाही, तर तिने या चित्रपटाची पटकथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे. चित्रपटात तिच्यासोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब ही तरुण कलाकारांची तगडी फळी आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर यांसारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट काल, १० ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

