(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत खैर लाकडांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत खैराच्या झाडांचे १८१ नग लाकूड आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ११ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक जी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध वृक्षतोड व बेकायदेशीर लाकूड वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शनिवारी (दि. ७) सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना रत्नागिरी तालुक्यातील मौजे निवळी-बावनदी येथील रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बोलेरो पिकअप (एमएच-१४-एचजी-७३३८) आणि टाटा योद्धा (एमएच-०८-एपी-४३३९) या दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांची लहान-मोठ्या आकारातील एकूण १८१ नग लाकडे विनापरवाना वाहतूक करताना आढळून आली.
प्राथमिक तपासात वाहनचालक अजित गंगाराम चव्हाण (वय २६, रा. आंबडस, ता. खेड), अरबाज हमीद सुर्वे (वय ३४, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, ता. खेड) व त्याच्यासोबत असलेला अक्षय टराजू चव्हाण (वय २८, रा. भिंगळोली, ता. मंडणगड) यांनी खैराची झाडे तोडून त्यांची चोरी करून बेकायदेशीर वाहतूक केल्याचे उघड झाले. या कारवाईत खैराची १८१ नग लाकडे आणि दोन वाहने असा एकूण ११ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३१७ (२), ३ (५) तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२)(ब) व ४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रे. पो. उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन डोमणे, भैरवनाथ सवाईराम तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

