(देवळे / प्रकाश चाळके)
शहरांसह ग्रामीण भागात लग्नसराईच्या धामधूमीमध्ये बदलत्या काळानुसार परंपरांमध्येही नवे प्रयोग दिसून येत आहेत. आधुनिकतेचा प्रभाव वाढत असतानाही, डिजिटल युगात हाताने रंगवलेल्या मराठी अंतरपाटांना विशेष मागणी वाढताना दिसत आहे.
लग्नासाठी सजवलेले हॉल, मंडप किंवा गावातील अंगणात उभारलेले पारंपरिक मंडप यामध्ये सर्वत्र आकर्षक आणि नाविन्यपूर्ण सजावट केली जात असली, तरी मंगलाष्टकांच्या वेळी वधू-वरांमध्ये धरला जाणारा अंतरपाट आता खास बनला आहे. या अंतरपाटांवर हाताने रंगवलेली मराठी नावे, स्वस्तिकसारखी शुभ चिन्हे, फुलांची कलाकुसर आणि नक्षीकाम यामुळे लग्नसोहळ्याला पारंपरिक सौंदर्याची जोड मिळत आहे.
हा ट्रेंड केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता शहरांमध्येही लोकप्रिय होत आहे. परिणामी, पेंटिंग करणाऱ्या स्थानिक कलाकारांना आपल्या कलेला नवी संधी मिळत असून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय, रुखवतामध्येही रेडीमेड वस्तूंऐवजी घरच्या घरी तयार केलेल्या विविध वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यांमध्ये पारंपरिकतेसोबतच वैयक्तिक स्पर्शही अधिक ठळकपणे दिसून येत आहे.
देवरुख येथील चित्रकार प्रवीण हर्डीकर यांनी सांगितले की, “डिजिटल युगातही गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही मराठी अक्षरांतील अंतरपाट ऑर्डरनुसार तयार करत आहोत. लग्नसोहळ्यांबरोबरच व्रतबंध कार्यक्रमांसाठीही या अंतरपाटांची मागणी वाढली आहे.”
हाताने रंगवलेल्या या अंतरपाटांमुळे पारंपरिक कलांना नवसंजीवनी मिळत असून, आधुनिकतेतही संस्कृती जपली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

