(संगमेश्वर / एजाज पटेल)
जिद्द, मेहनत आणि संस्कार यांची साथ असेल, तर परकी भाषा किंवा वेगळं वातावरण अडथळा ठरत नाही, याचं जिवंत उदाहरण फूणगुसचा सुपुत्र अर्श बासित मुजावर ठरला आहे. सौदी अरेबियातील रधवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत त्याने ९३ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे फूणगुस गावात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्शच्या यशामागे त्याच्या कुटुंबीयांचे संस्कार आणि सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची ठरली. त्याचे आजोबा, हजरत शेख जाहीर शेख पीर दर्ग्याचे माजी व्यवस्थापक स्व. नासिरभाई मुजावर यांनी आयुष्यभर जपलेली सचोटी, सेवा आणि निष्ठा यांची परंपरा अर्शमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या मूल्यांनीच परदेशात राहूनही त्याला शिक्षणाबद्दलची निष्ठा कायम ठेवण्याची ताकद दिली.
या यशामागे वडील बासित मुजावर यांचेही मोठे योगदान आहे.
कुटुंबाच्या भविष्यासाठी परदेशात मेहनत करत असतानाच त्यांनी मुलाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अर्शने सातत्याने प्रगती साधत आज ही उल्लेखनीय कामगिरी गाठली.
कोकणातील वातावरणात शिक्षणाची पायाभरणी झाल्यानंतर सौदी अरेबियातील वेगळ्या शैक्षणिक पद्धतीत जुळवून घेणे अर्शसाठी आव्हानात्मक होते. मात्र त्याने त्या आव्हानांवर मात करत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.
अर्शच्या यशामुळे फूणगुस गावात उत्साहाचे वातावरण असून, स्थानिकांसह सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
यशानंतर अर्श म्हणाला, “९३ टक्के गुण मिळवण्याचा आनंद आहे, पण आजोबा आज आपल्यात नाहीत याची खंतही आहे. त्यांचे आशीर्वादच माझ्या पाठीशी होते. वडिलांनी परदेशात राहून केलेल्या कष्टाचे चीज करायचे होते, हे यश त्यांनाच अर्पण आहे.”
अर्शचे चुलते नूर मोहम्मद मुजावर म्हणाले, “अर्शच्या यशामुळे आमच्या कुटुंबाचा आणि गावाचा सन्मान वाढला आहे. त्याने परदेशात राहूनही आपल्या संस्कारांना जपले, हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
अर्श मुजावरच्या या यशामुळे फूणगुस गावाचा नावलौकिक उंचावला असून, त्याने कोकणातील तरुणांसमोर नवे आदर्श उभा केला आहे.

