(संगमेश्वर / प्रतिनिधी)
नवरात्रीच्या पावन पर्वात देवीभक्तीचा उत्सव साजरा होत असताना संगमेश्वर तालुक्यातील सायले येथील तरुण चित्रकार सारिका पांचाळ यांनी आपल्या कुंचल्यातून देवीच्या विविध रूपांचे मनोहारी चित्रण साकारले आहे.
मूळच्या मुंबईच्या असलेल्या सारिका पांचाळ यांनी एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून बी.व्ही.ए. ही पदवी घेतली आहे. शालेय वयापासूनच चित्रकलेची गोडी लागलेल्या सारिकांचे आवडते विषय म्हणजे निसर्गचित्रे व कंपोझिशन. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत त्यांनी कौशल्य दाखवत अनेक पारितोषिके मिळवली. विवाहानंतर गेली दोन वर्षे त्या संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे स्थायिक असून आपल्या कलाविश्वात रमल्या आहेत.
नवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी देवीची सुवर्णतारा, कृष्णतारा, शैलपुत्री आणि कालरात्री ही रूपे जलरंगाच्या माध्यमातून साकारली आहेत. सुवर्णतारा भक्तांना सौभाग्य व स्थैर्याचा आशीर्वाद देते, तर कृष्णतारा रूपातून देवी वाईटाचा संहार करून रक्षण करते. शैलपुत्री ही हिमालयकन्या असून ती देवी सतीचे रूप मानली जाते. तर कालरात्री हे माता दुर्गेचे उग्र रूप आहे, जे अंधःकाराचा नाश करून भक्तांना भयमुक्त करते. या कलाकृतींमधून देवीचे सामर्थ्य, तेज आणि करुणा यांचे कलात्मक दर्शन घडत असल्याचे समीक्षकांचे मत आहे.

