(संगमेश्वर /एजाज पटेल)
भक्तीभावाने केलेलं देवदर्शन आणि आनंदाने सुरू असलेला प्रवास एका भीषण अपघातामुळे काळवंडला आहे. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रवासाचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला असून, कुरधुंडा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दापोलीतील २५ वर्षीय तरुणी मानसी विलास घडवले ही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकी चालक अक्षय विजय कानसरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षय विजय कानसरे रा. उजगाव, संगमेश्वर आणि मानसी विलास घडवले रा. लाडघर, दापोली हे दोघे ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. दिवसभर गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन आणि परिसर फिरून झाल्यानंतर ते त्याच दिवशी सायंकाळी संगमेश्वर येथे परतले आणि तेथेच मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी, ९ एप्रिल रोजी पुन्हा संगमेश्वर येथील देवदर्शन आणि बाजारपेठेत खरेदी आटोपल्यानंतर, अक्षय त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून क्र. एम. एच. ०८ ए. क्यू. ६४०४ मानसीला घेऊन कुरधुंडाच्या दिशेने निघाला. मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कुरधुंडा येथे अक्षयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी वेगात असतानाच रस्त्यावर घसरली.
या भीषण अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या मानसीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेला हा सुखद प्रवास एका क्षणात भीषण दुर्घटनेत बदलला.
या घटनेची माहिती आणि कागदपत्रे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजि. नं. ०६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये ही नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार एस. एस. जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मानसीची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

