( रत्नागिरी/प्रतिनिधी )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या ब्रिजवर रविवारी (19 एप्रिल) पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून थेट १५ फूट खाली विहिरीत कोसळून अपघात घडला. या अपघातात ट्रक चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (एमएच ०६ बीडी २५५५) लोखंडी साहित्य घेऊन पालीहून रत्नागिरीकडे जात होता. पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास हातखंबा ब्रिजवर आल्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव ट्रकने प्रथम समोरील आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे ९९१३) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेने आंब्याच्या पेट्या घेऊन वेंगुर्लाहून वाशीला निघालेला टेम्पो पलटी झाला. यानंतर पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या आयशर टेम्पोला (एमएच ०५ ईएल ०२२७) धडकला. दरम्यान, अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या ईरटीका कार (एमएच ४६ सीआर ९१२३) ला देखील उजव्या बाजूने धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की अपघातग्रस्त ट्रक थेट ब्रिजच्या खाली सुमारे १५ फूट खोल विहिरीत कोसळला.
या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू होते. ट्रकमधील क्लीनर योगेश गौतम माळी (वय ३२, रा. धाराशिव) तसेच महामार्गावरील कामगार राजू कुमार (वय १९, रा. उत्तर प्रदेश) हेही जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो चालक इकबाल याकूब खान (वय ४२, रा. झाराप, सिंधुदुर्ग) आणि ईरटीका चालक विशाल विजय पाटील (वय ३८, रा. रायगड) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ जगतगुरु नरेंद्र महाराज ॲम्बुलन्सच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस तात्काळ दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर अपघातातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या उपस्थितीत पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.
जबाबदारी पार पाडण्याचा ठेकेदार कंपनीकडून केविलवाणा प्रयत्न
सध्या या भागात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या अपघाताने केवळ एक घटना उघड केली नाही, तर रस्ते बांधकामातील गंभीर निष्काळजीपणाचा पर्दाफाश केला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, तो भाग आधीपासूनच अतिशय धोकादायक बनला असतानाही तेथे कोणतीही पूर्वतयारी किंवा सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नव्हती, ही बाब संतापजनक आहे. अपघाताच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आवश्यक असलेल्या रेडियम पट्ट्या लावण्यात आलेल्या नव्हत्या. रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना मार्गाचा अंदाज यावा यासाठी या पट्ट्या अत्यावश्यक असतात. मात्र, संबंधित यंत्रणेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येते. एवढेच नव्हे, तर रस्त्यावर सुरू असलेल्या कामाबाबत कोणताही डायव्हर्जन फलकही लावण्यात आलेला नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतरच सकाळी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एक फलक उभारल्याचे दिसून आले. म्हणजेच, दुर्घटना घडल्यानंतरच जाग आलेल्या यंत्रणेने आपली जबाबदारी पार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले. या सर्व प्रकारामुळे संबंधित ‘ईगल’ कंपनीचा मनमानी आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळणे ही केवळ औपचारिकता नसून नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित बाब आहे. मात्र, या कंपनीकडून सातत्याने हलगर्जीपणा होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. प्रशासनाने अशा गंभीर बाबीकडे डोळेझाक करणे हेही तितकेच चिंताजनक आता मानले जात आहे.


