(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे ‘ड्राइव्ह-इन’ हॉटेलसमोरील रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या ४८ तासांत याच ठिकाणी सहा ते सात भीषण अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्गावरील अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि ठेकेदाराच्या निष्काळजी कारभारामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या ठिकाणी करण्यात आलेल्या डायव्हर्शनवर आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मार्गदर्शक फलकांचा अभाव, रात्री दिसतील असे रिफ्लेक्टर्स नसणे आणि योग्य बॅरिकेड्स न लावता रस्त्यात मातीचे ढिगारे टाकणे, यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वेगाने येणाऱ्या वाहनांना हे अडथळे दिसत नसल्याने अपघात होत आहेत.
गुरुवारी रात्री पुण्यातील प्रवाशांची कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने जीवितहानी टळली. त्याचवेळी दोन दुचाकीस्वारही जखमी झाले. मात्र, या घटनांनंतरही ठेकेदार किंवा प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत.
यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा अपघातांची मालिका सुरूच राहिली. एका इनोव्हा गाडीसह रुग्णवाहिका आणि दोन ते तीन दुचाकी या सापळ्यात अडकल्या. आरवली ते कांटे दरम्यान या अपघातांमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
स्थानिकांच्या मते, यापूर्वीही याच ठिकाणी अपघात झाले आहेत, तरीही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. वेळेत योग्य उपाययोजना केल्या असत्या, तर पुढील अपघात टाळता आले असते, अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तातडीने योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

