(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रसिद्ध व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे लक्ष्मण विश्राम सक्रे (वय ८१) यांचे बुधवारी, दि. १५ एप्रिल रोजी कोल्हापूर येथील केअर सेंटरमध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचल व परिसरात सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लक्ष्मण उर्फ काका सक्रे हे पाचल पंचक्रोशीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. तुकाराम सक्रे (दादा), जनार्दन सक्रे आणि लक्ष्मण सक्रे असे तीन भाऊ असलेल्या सक्रे कुटुंबात त्यांचे स्थान विशेष होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत पाचल दिवाळवाडी येथे घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत गेले आणि दादर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुन्हा गावी परत येत १९६६ च्या सुमारास पाचल बाजारपेठेत स्वतःचे “जनता जनार्दन स्टोअर्स” हे किराणा मालाचे दुकान सुरू केले. त्या काळात त्यांनी आपल्या प्रामाणिक व्यवहाराने आणि लोकाभिमुख स्वभावाने व्यापारी क्षेत्रात विशेष विश्वास संपादन केला. पाचलमधील सर्वात जुने व्यापारी म्हणून त्यांना विशेष मानाचे स्थान होते.
व्यापारी क्षेत्रासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. तत्कालीन स्वातंत्र्यसैनिक आण्णा लब्दे यांच्या सहकार्याने त्यांनी व्यापारी संघटनेचे खजिनदार पद तब्बल सहा वर्षे समर्थपणे सांभाळले. तसेच पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल येथे सदस्य, खजिनदार आणि नंतर सचिव म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
पाचल ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व वॉर्डमधून निवडून येत त्यांनी सदस्य म्हणून लोकांचा विश्वास संपादन केला. एवढे सर्व असूनही त्यांनी कधीही सरपंच पदाची अपेक्षा बाळगली नाही, ही त्यांच्या निरलस सेवाभावाची साक्ष आहे.
शालेय जीवनातही त्यांची वेगळी ओळख होती. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्यांनी उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळवला होता. त्याचप्रमाणे प्रभादेवी येथील महाराष्ट्र कामगार मंडळात उत्कृष्ट कॅरमपटू म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे राहिले. श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राजकीय क्षेत्राशी थेट संबंध नसतानाही सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनानंतर पाचल बाजारपेठेत व्यापारी संघटनेच्या वतीने १०० टक्के बंद पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा बंद त्यांच्या कार्याबद्दलचा आदर आणि समाजातील त्यांच्या मानाच्या स्थानाची जाणीव करून देणारा होता. त्यांच्या पश्चात संदीप आणि शीतल अशी दोन मुले, तसेच दोन नाती असा परिवार आहे.
काका सक्रे यांच्या निधनाने पाचल गावाने एक ज्येष्ठ, समाजाभिमुख आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

