(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी शहराजवळील चर्मालय चौक पावसाळ्यात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्येचे केंद्र बनला आहे. रस्त्याचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने या चौकात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पावसाची सर कोसळताच चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून जलतळ्यांचे स्वरूप निर्माण होते. परिणामी रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना वाहने सावधगिरीने चालवत चौक पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, या भागातील पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेले रस्ते काम अद्याप रखडलेले आहे. अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत असून, वाहतुकीचा वेग मंदावून चौकात लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र रोजच दिसून येत असते.
कोट्यवधी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी होत असताना अशा महत्त्वाच्या चौकात मूलभूत सुविधा अपुऱ्या राहणे आणि कामे प्रदीर्घ काळ अर्धवट ठेवणे, यामुळे रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट कंपनीच्या नियोजनक्षमतेवर आणि कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा विचार न करता कामे संथ गतीने सुरू असल्याची टीकाही होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही चौकातील जलनिस्सारण, रस्त्याची समतलता आणि वाहतूक व्यवस्थापनाकडे आवश्यक तेवढे लक्ष न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासनाने तातडीने रखडलेली कामे पूर्ण करून चर्मालय चौक कायमस्वरूपी सुरक्षित आणि सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, चर्मालय चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत चौकात वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी तीन ते चार वाहतूक पोलिस तैनात असल्याचे चित्र दिसून येत असल्याची नागरिकांची भावना आहे. नियमांचे पालन आणि कारवाई ही आवश्यक असली, तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांचे नियोजन, मार्गदर्शन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यावरही तितकाच भर दिला जाणे अपेक्षित आहे. चौकातील वाहतूक सुरळीत राहिल्यास नियमभंगाच्या घटनांमध्येही घट होऊ शकते, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर विखुरलेली खडी तातडीने हटवावी
चर्मालय चौकात रस्त्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात बारीक खडी विखुरलेली असल्याचेही दिसून येत आहे. पावसाच्या पाण्यासोबत ही खडी रस्त्यावर पसरत असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडण्याचा धोका वाढला आहे. ओल्या रस्त्यावर खडीमुळे वाहने घसरण्याची शक्यता निर्माण होत असून, अपघाताचा धोका अधिक गडद झाला आहे. रस्ते कामे पूर्ण न करता खडी तशीच सोडल्याने संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न लक्षात घेऊन चौकातील विखुरलेली खडी तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

