(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
आषाढी एकादशी आणि मोहरम या दोन प्रमुख सणांचे निमित्त साधत राजापूर तालुक्यात यंदा धार्मिक सलोख्याचे उदाहरण घालून देण्यात आले. विशेष म्हणजे, यंदा या सणांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कृतीतून एकतेचा प्रतीक ठरलेला आदर्श समोर ठेवला. त्यांनी मोहरमच्या मिरवणुकीत ताजियाला खांदा दिला आणि एकादशीच्या दिवशी पालखी उचलून धार्मिक ऐक्याचा प्रत्यक्ष संदेश दिला.
हिंदू-मुस्लिम समाजाने अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि भक्तिभावाने हे सण साजरे केले. त्यामुळे राजापूर परिसरात एकोप्याचे व सकारात्मक वातावरण तयार झाले होते. एकीकडे आषाढी एकादशीच्या दिंडीत पोलिसांचा सहभाग ठळकपणे दिसून आला, तर दुसरीकडे मोहरमच्या मिरवणुकीतही पोलिस अधीक्षकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
राजापूरच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली, की जिल्हा पोलीस अधीक्षक पांडुरंग मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या दिंडीत गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालले. त्यांच्या या कृतीने लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पोलीस दल जनतेच्या सोबतीने सण साजरे करत असल्याची सकारात्मक भावना रुजली. मोहरमच्या ताजियामध्ये सहभागी होताना अधीक्षक बगाटे यांनी ताजियाला खांदा दिला आणि ऐक्याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या उपस्थितीने आणि सहभागाने एकप्रकारचा समरसतेचा संदेश देण्यात आला. या दोन्ही मिरवणुकांसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यामागे नागरिकांची परस्पर समज, संयम व प्रशासनाचे कुशल नियोजन कारणीभूत ठरले.
अधीक्षक बगाटे यांच्या कृतीतून धार्मिक सलोखा जपण्याचे आणि एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. राजापूरसह संपूर्ण जिल्ह्यासाठी ही घटना प्रेरणादायी ठरली आहे. सण हे केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक ऐक्याचे माध्यम असू शकतात, याची साक्ष या अनुभवातून मिळाली. या ऐतिहासिक आणि सकारात्मक घडामोडीमुळे राजापूरने धार्मिक सलोख्याचा एक नवा अध्याय लिहिला असून, तो पुढेही कायम राहील अशीच सर्वांची अपेक्षा आहे.