(खेड / रत्नागिरी)
भरणे येथील नव्या जगबुडी नदी पुलावर कार दरीत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सेफ्टी ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र तब्बल २० महिने उलटूनही या ऑडिटचे काम पूर्ण झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे “ऑडिटचे नेमके काय झाले?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या भीषण अपघातानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. अपघातांची कारणमीमांसा करण्यासाठी थर्ड पार्टीमार्फत सेफ्टी ऑडिट करण्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. तथापि, या सर्व घोषणांचा प्रत्यक्षात कितपत पाठपुरावा झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, सुमारे दहा महिन्यांपूर्वी मिरारोड-मुंबई येथून देवरुख येथे अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मोरे व पराडकर कुटुंबातील सहा जणांचा याच पुलावर भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा नव्या जगबुडी पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र त्यानंतरही संबंधित यंत्रणेकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवरच समाधान मानण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. नवा जगबुडी पूल सध्या अपघातांच्या दृष्टीने ‘हॉटस्पॉट’ बनला असून, विशेषतः अवजड वाहनांच्या अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. पुलावरील वक्राकार वळणामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
याशिवाय, पुलावरील संरक्षक भिंतींची मोडतोड होत असल्याने भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेकडून तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सेफ्टी ऑडिटचा अहवाल अद्यापही अंधारातच असल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने केवळ घोषणांपुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे, अशी तीव्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

