(खेड)
व्हॉट्सअॅप, फोन कॉल्स आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणीचा छुपा पाठलाग करून अश्लील संदेश, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच बनावट इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी वसई-मुंबई येथून अटक केली आहे. आरोपी कृष्णकांत सुभाष वैध (वय २८, रा. वैद्य चाळ, साखीविहार रोड, निती पवई, मुंबई) यास २९ मे रोजी पहाटे १२.५६ वाजता अटक करण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादी यांनी नोव्हेंबर २०२४ पासून २४ एप्रिल २०२५ पर्यंत आरोपीकडून सतत अश्लील मेसेज, धमक्या व ऑनलाइन छळ होत असल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दिली होती. आरोपीने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट तयार करून फिर्यादीचे फोटो व्हायरल करत त्यांना ब्लॅकमेल केल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे खेड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर १५७/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ७८, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ई), ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड आणि खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागोजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. नि. नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला. निती, पवई (मुंबई) येथे पोलीस पथकाने धाड टाकून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पांडुरंग भोयर, पोहेकॉ. दीपक गोरे, पो.कॉ. अजय कडू, पो.कॉ. राम नागुलवार, पो.कॉ. वैभव ओहोळ ,पोहेकॉ. रमिज शेख (टेक्निकल अॅनालिसिस विंग) यांनी केली.