(खेड)
तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी नुकतीच वाळू चोरी रोखण्यासाठी तालुक्यातील ऐनवली-कुडोशी परिसरात जाऊन धडक कारवाई केली आहे. वाळूची वाहतूक होणारा रस्ता जेसीबीने खोदून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाळू माफियाचा रात्री चालणारा खेळ तूर्तास थांबला आहे. यापुढे वाळू चोरी निदर्शनास आल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.
खेड तालुक्यातील बांदरी पट्टयात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत लाखो रुपयांच्या महसुलाची वाळू माफिया अक्षरशः चोरी करत होते, प्रशासनाने खेड तालुक्यातील सर्व अवैध वाळू व्यवसाय बंद केले असताना बांधली पट्ट्यातील ऐनवली तसेच कुडोशी या भागात काही वाळू माफियाकडून रात्रीच्या सुमारास शेकडो ब्रास वाळूचा उपसा केला जातो.
यासंदर्भात अनेकांच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, वाळू माफियांनी नवीन शक्कल लढवत रात्री वाळू चोरीचा खेळ सुरू केला होता. यासंदर्भात खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुसरून मंडळ अधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्याऱ्यांना घेऊन जात ज्या रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक होत होती त्या ठिकाणी जेसीबीने मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळे वाळू वाहतुकीला आळा बसला आहे. यानंतर देखील अवैधरित्या वाळू काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे देखील महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जगबुडीत एनवरेनजीक वाळू उपशामुळे नदीपात्र धोकादायक
खेड तालुक्यातील एका बाजूला तालुक्यातील चोरट्या वाळू उपाशाला महसूल विभागाने बंद करण्याची भूमिका घेतली आहे, कारवाईचे सत्र सुरू केले आहे. तालुक्यातील बांदरी पट्टयात अनेक ठिकाणी वाळू चोरी रोखताना महसूल विभागाने दणका दिला आहे. मात्र याच जगबुडी नदीत एनवरे गावांनजीकच्या नदी पात्रात काही वाळू माफिया महसूल विभागाला न जुमानता बिनधास्त वाळूचा उपसा करत आहेत. नदीपात्रात वाळू काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या दगडांचा ढीग धोकादायक ठरत आहे.