(खेड)
घराकडे जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट मुंबई–गोवा महामार्ग रोखल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वेरळ येथे घडली. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वेरळ येथील हॉटेल गणपती कृपा परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता अचानक महामार्गावर येत वाहतूक अडवली. त्यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली. घटनास्थळी उपस्थित वाहनचालकांनी त्याला कारण विचारले असता, ठेकेदाराकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना कंटाळून हा मार्ग अवलंबल्याचे त्याने सांगितले.
महामार्गाच्या कामामुळे स्थानिकांना घराकडे जाण्यासाठी सुरक्षित आणि पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याची गंभीर समस्या त्याने मांडली. तोंडावर पावसाळा येत असताना ही अडचण अधिक तीव्र होणार असल्याचीही त्याने भीती व्यक्त केली. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर संतप्त होऊन महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

