(रत्नागिरी / प्रतिनिधी)
साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया निमित्त जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आंब्यांची आवक वाढू लागली असली, तरी दर उच्चांकी पातळीवर असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची गोडी चाखणे कठीण झाले आहे. सध्या बाजारात हापूस आंबा सुमारे ७५० ते १००० रुपये डझन दराने विकला जात असून, किंमतीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अक्षय्य तृतीया हा वर्षातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये देवाला व पितरांना आंब्याचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आंबा खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवसापासूनच आंब्याच्या हंगामाला अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर रविवारी साजऱ्या होणाऱ्या या सणानिमित्त घरोघरी आमरस-पुरीचा खास बेत रंगणार आहे. यंदाही पारंपरिक खाद्यसंस्कृतीनुसार आमरस-पुरीसोबत आंबेडाळ, हिरव्या कैरीचे पन्हे, तसेच आंब्याची तिखट-गोड चटणी असा सुग्रास मेनू अनेक घरांमध्ये पाहायला मिळणार आहे. निसर्गचक्रानुसार अक्षय्य तृतीयेपर्यंत आंबा पूर्णपणे परिपक्व होऊन खाण्यास योग्य होतो. त्याआधीचा आंबा कोवळा अथवा कच्चा असण्याची शक्यता असल्याने या मुहूर्तावर आंबा खाण्याची परंपरा रूढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
दरम्यान, कोकणातील रत्नागिरी व देवगड परिसरातील हापूस आंब्याला या काळात बाजारात प्रचंड मागणी असते. हा कालावधी हापूस हंगामाचा शिखर काळ मानला जातो. मात्र, वाढत्या दरांमुळे या ‘राजा फळा’चा आस्वाद घेणे सर्वसामान्यांसाठी आव्हानात्मक ठरत असून, आगामी दिवसांत दरात काहीशी दिलासा मिळेल का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

