( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरी शाखेचे जिल्हा सरचिटणीस एन. बी. कदम यांना तेजस सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्यातर्फे दिला जाणारा ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने बौद्ध समाजातील धम्मकार्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ७५ मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये कदम यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा ६ जून २०२६ रोजी संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे ‘संविधान अमृत महोत्सव’ कार्यक्रमात आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एन. बी. कदम हे गेली २५ वर्षे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. २००४ पासून भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभाग प्रमुख म्हणून तसेच २०१९ पासून जिल्हा सरचिटणीस म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या माध्यमातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मुंबई येथे धम्मप्रबोधनाची प्रभावी चळवळ उभी राहिली असून विविध प्रवचन व प्रशिक्षण शिबिरांतून त्यांनी नवोदितांना मार्गदर्शन केले आहे.
उत्कृष्ट प्रवचनकार व निवेदक म्हणून ओळख असलेल्या कदम यांनी लांजा तालुक्यातील विविध शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयांवर व्याख्याने देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत केले आहे. धार्मिक कार्याबरोबरच त्यांनी रंगभूमीचीही सेवा करत ‘आकांत’, ‘दिवा नाही दारी’, ‘मानव होई दानव जेव्हा’, ‘सायलेन्स खटला चालू आहे’, ‘कुर्यात सदा मंगलम’ आदी नाटकांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. ‘असं आणि इतकंच’ व ‘चांदनवेल’ या नाटकांद्वारे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी विशेष दाद मिळवली आहे. सध्या ते ‘कार्यकर्ता’ आणि ‘बाळा जो जो रे’ या नाटकांत कार्यरत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाची भूमिका बजावत हेरिटेज आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच ज. ग. पेडणेकर माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी तळवडे व राजयोग पार्क गृह निर्माण सोसायटी, लांजा येथे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. कदम यांना यापूर्वी लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचा ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कार, विश्व समता कलामंच संगमेश्वरचा ‘धम्मरत्न’ व ‘धम्मभूषण’ तसेच २०२३ चा राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र रत्न 2026’ पुरस्कार जाहीर झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

