(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबत कडक कारवाईची मोहीम राबवली असून, गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २७ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यापक कारवाईत रत्नागिरी विभागाने लक्षणीय कामगिरी नोंदवत दंडवसुलीत मोठा वाटा उचलला आहे.
रत्नागिरी विभागातच वर्षभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ९ कोटी ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षीच्या ७ कोटी ७४ लाख रुपयांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय मानली जात आहे. या कालावधीत २१ हजार ५२७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली, तर अवैधरित्या तिकीट वापरणाऱ्या १० हजार ७४१ प्रवाशांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. प्रवाशांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष भरारी पथके कार्यरत केली असून, या पथकांनी विविध गाड्यांमध्ये अचानक तपासण्या करत २ हजार २०४ प्रवाशांवर कारवाई केली. या मोहिमेमुळे नियम पाळणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी प्रवाशांना सुरक्षिततेचे भान राखण्याचे आवाहन केले आहे. काही प्रवासी तिकीट न काढता रेल्वेच्या पायऱ्यांवर बसून जीवघेणा प्रवास करतात, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढत असून, प्रत्येक प्रवाशाने अधिकृत तिकीट काढूनच प्रवास करावा आणि धोकादायक कृती टाळाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या मोहिमेमुळे शिस्तबद्ध प्रवास संस्कृतीला चालना मिळत असून, आगामी काळातही अशा कारवायांना अधिक गती दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

