( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणानंतरही सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने परिसरातील कचरा गोळा करून पिशव्यांमध्ये भरला आणि तो एकाच ठिकाणी नीट साठवून ठेवला.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या उपक्रमातून “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने उपस्थित नागरिकांनीही या कृतीचे कौतुक केले. जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली चार दिवसांची अखंड धावपळ आणि नियोजन ठळकपणे दिसून आले. प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष देत कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. नियोजन, समन्वय आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे संपूर्ण सोहळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. “मी पदाधिकारी आहे” हा गर्व न बाळगता प्रत्येकाने मिळेल ते काम स्वीकारत खांद्याला खांदा लावून काम केले. मोठे-लहान असा भेद न करता सर्वांनी एकजुटीने जबाबदाऱ्या पार पाडल्या. या सामूहिक प्रयत्नांमुळेच कार्यक्रमाला भव्यता आणि यश लाभले आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना साफसफाई करताना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, तसेच कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोय भासू नये, याची विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. उत्सव साजरा करतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कृतीमुळे आंबेडकरी समाजाची जबाबदार आणि संवेदनशील बाजू देखील अधोरेखित होत आहे.

