(देवरुख / सुरेश सप्रे)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला लुटून अपहरण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले (रा. कोकण नगर, रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. यासह या गुन्ह्यातील सर्व नऊ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
ही घटना ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घडली होती. कोल्हापूर येथील प्रथमेश तानाजी दळवी हे आपल्या बोलेरो गाडीतून वेतोशी (रत्नागिरी) येथून म्हैस घेऊन कोल्हापूरकडे जात होते. आंबा घाटातील दख्खन परिसरात पोहोचताच, ‘भारत सरकार’ असा स्टिकर लावलेल्या इनोव्हा आणि थार या दोन वाहनांतून आलेल्या टोळीने त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत दळवी यांना बेदम मारहाण केली व जबरदस्तीने त्यांचे अपहरण करून इनोव्हा गाडीत बसवले. यावेळी त्यांच्याकडील रोख रक्कमही लुटण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली होती. तपासादरम्यान यापूर्वीच आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, मुख्य सुत्रधार रत्नागिरीत लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शागिद गणी बलबले याला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे इतर गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

