(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची दीर्घकाळ चाललेली समस्या दूर करण्यासाठी फुणगूस आणि परिसरातील गावांमध्ये (बीएसएनएल ) भारत दूरसंचार निगम लिमिटेड यांनी मोठ्या अपेक्षेने मोबाईल मनोरा उभारला. मनोरा उभा राहिल्याने नागरिकांना अखेर मोबाईल सेवांचा लाभ मिळेल, डिजिटल संपर्क वाढेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र उभारणीला महिने उलटले तरी मनोरा सुरु न झाल्याने आशेने घेतलेली बीएसएनएलची सिमकार्डे आता कुचकामी पडून आहेत, आणि लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
नेटवर्क नसल्यामुळे शिक्षण, शेती, व्यवसाय ठप्प
फुणगूस तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कअभावी नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागत होते. ऑनलाईन वर्गांसाठी विद्यार्थ्यांना उंचवट्यांवर चढणे, शेतकऱ्यांना हवामान माहिती मिळवण्यासाठी इतर गावांत धावपळ, व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारात अडथळे, अशी अनेक उदाहरणे आहेत. बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात येत असल्याची बातमी पसरताच नागरिकांनी नव्या आशेने बीएसएनएलची सिमकार्डे घेतली. मात्र आता हीच सिमकार्डे निष्प्रयोज्य ठरत असून लोकांमध्ये भ्रमनिरासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की “टॉवर उभारल्यावर आम्हाला वाटले की आता तरी नेटवर्क मिळेल, पण महिने उलटले तरी एक सिग्नलही येत नाही. सरकारी सेवा देणारी कंपनीच जर वेळेवर सेवा देणार नसेल तर सामान्यांनी कुणाकडे जायचे?”
स्थानिक यंत्रणेकडे पाठपुरावा; पण प्रतिसाद शून्य
ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मनोरा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असले, तरी कोणताही ठोस कालावधी देण्यात आलेला नाही. परिणामी लोकांमध्ये प्रशासनाबद्दल अविश्वास वाढू लागला आहे.
सरकारी टॉवर, पण सेवा ‘तत्परते’ऐवजी ‘उशिरा’
बीएसएनएल हा भारत सरकारचा प्रमुख दूरसंचार विभाग असून ग्रामीण भागापर्यंत नेटवर्क पोहोचविणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. तरीही फुणगूससारख्या दुर्गम भागात उभारलेल्या टॉवरला कार्यान्वित करण्यात होणारा विलंब सरकारच्या डिजिटल इंडिया संकल्पनेलाच तडा देणारा ठरत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
शेतकऱ्यांना सरकारी योजना, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग,नागरिकांना बँकिंग, यूपीआय व्यवहार, छोट्या दुकानदारांना डिजिटल पेमेंट
या सर्वच गोष्टी नेटवर्कअभावी ठप्प होत असल्याने स्थानिकांच्या नाराजीचा पारा चढू लागला असून, जर मनोरा तातडीने कार्यान्वित केला गेला नाही तर ग्रामस्थ बीएसएनएलविरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा देत आहेत.

