(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील लोवले-मयूरबाग परिसरातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण तालुक्यात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीतून रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेण्यात आल्याने पालकवर्ग हादरला असून संगमेश्वर पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष काशीराम पडये यांचा मुलगा यश संतोष पडये (वय १२) हा ११ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाला. सुरुवातीला यश परिसरातच खेळत किंवा मित्रांकडे गेला असावा असा कुटुंबीयांचा समज होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
वडील संतोष पडये यांनी रात्रभर गावात तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली. दोन दिवस अथक प्रयत्न करूनही यशचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा संशय बळावल्याने कुटुंबीयांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
यश हा सहावीत शिक्षण घेत असून त्याचे वर्णन अत्यंत निरागस असे आहे. तो सुमारे ४ फूट उंच असून बेपत्ता होताना त्याने पांढऱ्या रंगाचा निळे पट्टे असलेला टी-शर्ट आणि जांभळ्या रंगाची हाफ पँट परिधान केली होती. अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने या घटनेमागील हेतूबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित हे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरातील संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
ग्रामीण भागातून अशा प्रकारे अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून यशचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून त्याला सुखरूप परत आणण्यात यश येणार का, याकडे संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संबंधित वर्णनाचा मुलगा कुठेही आढळल्यास नागरिकांनी तात्काळ संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

