(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक स्थितीबाबत गंभीर चित्र समोर आले असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यावर उपाय म्हणून व्यापक सुधारणा आराखडा राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
एसटी मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपलब्ध आकडेवारीनुसार, एसटीचे एकूण उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये इतके नोंदवले गेले, तर खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला. त्यामुळे आर्थिक तूट वाढून मोठा तोटा निर्माण झाला आहे. दररोज सरासरी ३१.४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असताना ३३ कोटी रुपयांचा खर्च होत असून, दररोज सुमारे १.६० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचे स्पष्ट झाले.
२३ विभाग तोट्यात, मोठ्या शहरांतील स्थिती चिंताजनक
राज्यातील ३१ विभागांपैकी फक्त ८ विभाग नफ्यात असून उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत. विशेष म्हणजे नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे यांसारख्या मोठ्या विभागांतील वाढता तोटा प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, येत्या काळात बस सेवा, मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून कारणांचा अभ्यास आणि त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. सातत्याने तोट्यात असलेल्या विभागांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेषतः नागपूर विभागात अकार्यक्षम नेतृत्वाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ज्या अधिकाऱ्यांकडे आवश्यक अधिकार नाहीत, ते प्रभावी काम करू शकत नाहीत. त्यामुळे सक्षम नेतृत्व देणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
लवकरच मोठा सुधारणा आराखडा
एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, जबाबदारी निश्चिती आणि संसाधनांचा योग्य वापर यावर आधारित व्यापक सुधारणा आराखडा लवकरच लागू केला जाणार आहे. सरनाईक यांनी स्पष्ट केले की, दररोज होणारा तोटा कमी करून एसटीला नफ्याकडे नेणे हेच पुढील वर्षाचे मुख्य उद्दिष्ट असेल.

