भारतीय स्वातंत्र्यलढ्यानंतर देशाची संपूर्ण जबाबदारी स्वतंत्र भारताच्या जनतेवर टाकण्यासाठी भारतीय संविधानरूपी नियमावली प्रदान करणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या थोर कार्यास, उदात्त विचारांना आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन! १८९१ साली जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सामाजिक समता आणि न्याय या सुधारणावादी विचारांचा प्रभाव होता. दलित समाजाच्या वेदनांविषयी त्यांच्या मनात कणव होती. ‘वैचारिक लढा’ उभारण्यासाठी त्यांनी प्रबोधनाचा मार्ग अवलंबला.
त्यांचे विचार तलवारीच्या पात्याप्रमाणे होते. ज्याने त्यांचा अर्थ समजून घेतला तो आयुष्यात यशस्वी झाला. मात्र ज्याला अर्थ उमगलाच नाही तो दलदलीत खोल रुतणार हे नक्की. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा!” हा विचार स्वतंत्र भारताच्या जनतेसाठी मंत्रापेक्षा कमी नाही. अत्यंत बाळबोध पद्धतीने त्यांनी भारतीय समाजाला उन्नती करण्यासाठी तीन कलमी कार्यक्रम दिला. सर्वांत प्रथम त्यांनी शिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले असल्याने याबाबत त्यांनी आदर्शवादी भूमिका स्वीकारली. शिक्षण हा सकल समाजाच्या उन्नतीचा राजमार्ग असल्याचे त्यांनी ताडले होते. त्यामुळे जनतेने शिक्षित होण्याची पहिली पायरी चढावी यासाठी त्यांनी शैक्षणिक विचार मांडले, धोरणे मांडली.
दुसरा कार्यक्रम, संघटीत होण्याचा. पण त्यामागे आधीच्या कार्यक्रमाची परिपूर्णता अभिप्रेत आहे. कारण बाबासाहेबांना ही गोष्ट चांगलीच माहित होती की, अशिक्षित, अर्धशिक्षित समाज पटकन संघटीत होईल खरा, पण या संघटीत शक्तीचा उपयोग काही ठराविक लोकांच्या स्वार्थीपणाची भूक शमवण्यासाठी होईल. बाकी जनता उपाशीच राहील. त्यामुळे पुन्हा एकदा, शिक्षणाची प्राथमिक गरज पूर्ण करा आणि मगच पुढच्या टप्प्यावर या. संघटनेच्या शक्तीने मोठमोठी कामे लीलया पार पडतात हे भारतासाठी काही नवीन नाही; मात्र ब्रिटीशकालीन समाजरचनेमुळे अनेक पिढ्या खितपत पडल्या आणि त्यामुळे पाश्चात्यांच्या अनुकरणाला काही पर्याय नसावा. संघटनेची रचना, उद्दिष्टे, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती सुस्पष्ट आणि पारदर्शक असेल आणि हेतू शुद्ध असेल तर अशा संघटनेत तुम्ही स्वतःच्या इच्छेने समाविष्ट होऊ शकता. असं डॉ. आंबेडकरांचं मत होतं.
आणि तिसरा कार्यक्रम, अर्थातच संघर्षाचा. या संघर्षातून बाबासाहेबांना समाजात सकारात्मकता प्रवाहित करायची होती. आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करा. समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. दिनदुबळ्यांच्या उद्धारासाठी संघर्ष करा. पतितांना पवन करण्यासाठी संघर्ष करा. राष्ट्राला समर्पण देण्यासाठी स्वतःविरुद्धही संघर्ष करा. हा बाबासाहेबांच्या ‘संघर्षाचा अर्थ’. यात कुठेही अतिरेक नाही. स्वार्थ नाही. सामाजिक विद्वेष नाही. राजकीय वैरभावना नाही. मात्र हा अर्थ समजून घेण्यासाठी मुलभूत गरज काय? तर इथेही उत्तर मिळेल ‘शिक्षण.’.
बाबासाहेब तीन कार्यक्रम देऊन गप्प बसत नाहीत. ते पुन्हा म्हणतात, “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” आपण याचाही अर्थ समजून घेतला पाहिजे. आजचा सुशिक्षित युवक भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून स्वतःच्या जीवनाला आकार देईल, त्याला त्याच्या उत्कर्षासाठी कोणाचे मिंधे होण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून त्याला कर्तव्यांसह समान अधिकार दिले आहे. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी पर्यायाने देशासाठी जे योग्य आहे, जे आवश्यक आहे ते नैतिकतेच्या कसोटीवर तपासून करण्याचे स्वातंत्र्य त्याला मिळाले आहे. मात्र स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक जाणण्याची प्रगल्भता त्याच्याकडे असावी एवढीच अट आहे. आणि त्या अटीची पूर्णता शिक्षणातून होईल याची बाबासाहेबांना खात्री आहे.
बाबासाहेबांनी ‘मनुस्मृती जाळली’ असा प्रचार केला जातो. एक घटना म्हणून ते खरे असेल हे निःसंशय. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व पुस्तक जाळते ही गोष्ट एखाद्या घटनेपुरती मर्यादित रहात नाही. यासाठी कोकणचे सुपुत्र कवी केशवसूत यांच्या ‘तुतारी’चा संदर्भ समजायला अधिक सोपा राहील. ते म्हणतात “जुने जाऊद्या मरणा लागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका.” याचा अर्थ आता काळाप्रमाणे बदला. नवीन काळात काही नवीन घडवा, नवीन आदर्श तयार करा. स्वतःला दिशादर्शक बनवा. अजून किती काळ जुन्याला उरावर घेऊन समाजाचे शोषण करणार?
महर्षी मनु यांनी रामायणपूर्व काळात लिहिलेल्या मनुस्मृतीचा आणि आजच्या मनुस्मृतीचा तंतोतंत संबंध असेलच याची खात्री नाही आणि असलाच तरी आजच्या समाजव्यवस्थेला त्याचा उपयोग असेलच असेही नाही. त्यामुळे जर त्या स्मृतीमध्ये बदल करून अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळवून देण्याला सवर्णांचा विरोध असेल तर सवर्णांच्या देखत अशा स्मृतीचे दहन करून आम्ही आमचे अधिकार मिळवू शकतो हे दाखवून देण्यासाठी जाहीररित्या केलेला तो कार्यक्रम होता.
हे समजून घेण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. त्यासाठीच बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये आपल्या अनुभवाचे अद्वितीय प्रदर्शन घडवले. आणि घटनेत बदल करण्यासाठी घटनात्मक तरतुदींची सोय आधीच करून ठेवली. त्यातच भारतीय राज्यघटनेचा मूळ ढांचा कधीही बदलणार नाही अशी मेख मारून ठेवली आहे. त्यामुळे कोणत्याही विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले तरीही भारतीय राज्यघटना आचंद्रसूर्य राहील याची तजवीज आधीच करून ठेवलेली आहे. त्यामुळे अमुक एक सरकार सत्तेत आले तर राज्यघटना बदलेल अशा प्रचारावर विश्वास ठेवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अजोड बुद्धिमत्तेवर शंका घेण्यासारखेच आहे.
अजून एक गोष्ट, ‘माझ्या बापाने’ संविधान लिहिले… अशा आशयाचे साहित्य आजकाल पहायला मिळते. मुळात “आपण काही यशवंत नाही” आणि दुसरे म्हणजे हा निव्वळ थिल्लरपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला एका जातीच्या, धर्माच्या बंधनात नाही अडकवू शकत. ते एकटे सूर्याप्रमाणे सर्वांचे आहेत. त्यांना सर्व जातीधर्मांचे लोकं मानतात. त्यामुळे महापुरुषांना जातीपातीत विभागून त्यांची दीप्ती झाकोळणार नाही न याची काळजीही घ्यायला हवी. कारण त्यांच्या अस्तित्त्वाने केवळ एकाचाच नाही तर कोटी कोटी कुळांचा उद्धार झाला आहे.
जय भीम! जय हिंद!
श्री. योगेश अरविंद मुळे (प्राथमिक शिक्षक)
जि. प. शाळा पिरंदवणे नं. १, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
९५०३५६१८९७

